धरमपेठमध्ये ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत युनिसेक्स सलूनवर छापा; महिला आरोपी अटक, मालकीण फरार

नागपूर :- पोलिसांनी ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत अनैतिक मानव व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत धरमपेठ येथील LOOK BOOK BY INARA युनिसेक्स सलूनवर धाड टाकली. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत दीपा आनंद गोडडे (वय ३५, रा. गोकुळ पेठ) हिला अटक करण्यात आली असून सलूनची मालकीण पूजा रक्षित जोशी फरार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या दोघींनी अधिक पैशांचे आमिष दाखवून दोन तरुणींना देहव्यापारासाठी प्रवृत्त केले आणि सलूनच्या परिसरात त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. धाडीत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली तसेच ₹४०,०३० रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त केले.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेची कलम 143(2) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 अंतर्गत कलमे 3, 4, 5, 7 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईत पोलिस निरीक्षक राहुल शिरे, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांच्यासह पथकातील अन्य पोलिस कर्मचारी सहभागी होते.



