कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना वाचवा – विजय वडेट्टीवारांची मागणी

नागपूर : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि पैनगंगा नद्या उफाळल्याने शेत पाण्याखाली गेले असून हजारो एकर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी सोमवारी केली.
पिकांचे प्रचंड नुकसान
विदर्भ व मराठवाड्यातील ज्वारी, कापूस आणि सोयाबीन पिकांवर पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे पशुखाद्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये शेतकरी हताश झाले असून, मागील वेळच्या पावसाचे नुकसान भरपाईचे पैसे अजून मिळाले नाहीत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
कर्ज घेऊन मदत करा
“सरकार कर्ज घेत आहे, पण शेतकऱ्यांसाठी काही करत नाही. जर गरज असेल तर आणखी कर्ज घ्या, पण शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
शिवभोजन थाळी थांबणार?
वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर शिवभोजन थाळी योजनेसाठी सात महिन्यांपासून निधी न दिल्याचा आरोप केला. त्यामुळे गरीबांसाठी ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. “शेतकरी व मजुरांनी घाम गाळून श्रम केले आहेत, पण त्यांचे पैसे सरकार देत नाही. आत्महत्या झाल्यावरच का सरकार जागे होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.




