गुन्हे शाखा युनिट क्र. ५ ची कारवाई : गांजा विक्री करणारा आरोपी अटक, २ किलो ४०० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त

नागपूर : गुन्हे शाखा युनिट क्र. ५ च्या पथकाने शनिवारी (१७ ऑगस्ट २०२५) रात्री उशिरा मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे ५१,००० रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, डिझी रोडवरील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज परिसरात एक युवक गांजा विक्रीसाठी फिरत आहे. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख जमीर शेख इस्माईल (वय २२, रा. भगतवाडी, अकोला) असे सांगितले.
त्याच्या ताब्यातून रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेला २ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची विक्री करीत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कलम २०(ब)(२)(ब) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




