दलित चिमुरड्यावर अमानवीय अत्याचार; ऑल इंडिया पँथर सेनेचा संताप, दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी

वाळूज | वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयात सातवीत शिकणाऱ्या ऋतुराज कांबळे या दलित विद्यार्थ्यावर शिक्षकांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून पालक भयभीत झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यार्थी ऋतुराज कांबळे याला जाणीवपूर्वक टार्गेट करून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर होत असलेला हा अन्याय समाजमनाला अस्वस्थ करणारा असल्याचे सामाजिक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेना यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की –
निर्दयी शिक्षक शहा व विद्यार्थ्याला तुच्छतेने वागवणाऱ्या शाळा चालकावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा.
शाळेच्या संस्थाचालकाला सहआरोपी करण्यात यावे.
शिक्षणाधिकारी यांनी तातडीने शाळेची मान्यता रद्द करावी.
पोलिस आयुक्तांनी शाळेला भेट देऊन सिसीटीव्ही फुटेज जप्त करावेत.
राज्यभरातील आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक बळ द्यावे.
घटनेची गंभीर दखल गृहमंत्री, एससी-एसटी आयोग आणि सामाजिक न्याय मंत्री यांनी घ्यावी.
पँथर सेनेने स्पष्ट इशारा दिला की, जर कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल. तसेच “खाजगी शाळा बंद करा, सरकारी शाळा सुरू करा” अशी मागणी करून शिक्षणव्यवस्थेतील वाढत्या असमानतेवर लक्ष वेधले आहे.
दरम्यान, पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा अमानवीय अत्याचारांना बळी पडू नका व आवाज बुलंद करा. समाजातील दुर्बल घटकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्वांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढा दिला पाहिजे, असा ठाम संदेश पँथर सेनेने दिला आहे.




