इतवारी-गांधीबाग परिसरात 3 महिन्यांसाठी वाहतुकीवर कडक निर्बंध; सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत ऑटो, चारचाकी व जड वाहनांना बंदी

नागपूर : शहरातील गर्दीच्या आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या इतवारी-गांधीबाग परिसरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावर तोडगा काढण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
वाहतूक विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, 25 ऑगस्ट 2025 पासून ते 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत ऑटो, ई-रिक्शा, चारचाकी तसेच जड वाहनांचा प्रवेश इतवारी-गांधीबाग आणि आजूबाजूच्या बाजारपेठेत पूर्णतः बंद राहणार आहे. या वेळेत फक्त दुचाकी वाहनं आणि पादचारी यांना परवानगी असेल.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिसरातील अनेक रस्त्यांना वन-वे घोषित करण्यात आले आहे. त्यामध्ये होलकर चौक ते गांधीबाग, शहीद चौक ते इतवारी कपडाबाजार आणि रुईकर मार्ग यांचा समावेश आहे. तसेच, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना फक्त सकाळी 10 पूर्वी व रात्री 10 नंतरच प्रवेश दिला जाईल.
याशिवाय बाजार परिसरात नो-पार्किंग झोन तयार करण्यात आले असून, नियम तोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, खरेदीदारांना सुरक्षित वातावरण मिळेल आणि व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




