भंडाऱ्याचे पालकमंत्री अचानक बदलले : सावकारेंची हकालपट्टी,पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री

Bhandara : भंडारा जिल्ह्यात महायुती सरकारने सोमवारी रात्री घेतलेल्या निर्णयाने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना अचानक भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन झाले असून त्यांच्याकडे आता केवळ बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी राहणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक तसेच राज्यभरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भंडाऱ्यातील स्थानिक समीकरणे व भाजप-शिंदे गटातील समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सावकारेंची कार्यशैलीबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे.
पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्व उभे करण्याची रणनीती असल्याचेही सांगितले जाते.
आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे जिल्ह्याचा कारभार सोपवण्यात आल्यानंतर येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणात काय बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



