मोकाट व पाळीव कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना लागू,नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली माहिती

नागपूर : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मोकाट व पाळीव कुत्र्यांबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली असून त्यानुसार नागपूर शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेत पाळीव कुत्र्यांना कसे फिरवायचे, कुठे खाऊ घालायचे आणि कुत्र्यांमुळे होणाऱ्या संभाव्य त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांना कडक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेने निश्चित केलेल्या जागीच भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा अनधिकृत जागी खाऊ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ मनपा विभागाने ठरवलेल्या जागेतच या प्राण्यांना अन्न द्यावे, असे निर्देश दिले आहेत.
तसेच, पाळीव कुत्र्यांना फिरवण्यास मनाई नाही, मात्र त्यांना फिरवताना काही अटी बंधनकारक असतील. कुत्र्याला घेऊन जाताना त्याच्या तोंडाला जाळी (मझल) लावणे आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार हे पालन करणे बंधनकारक असून यामुळे कुत्र्यांमुळे होणारा संभाव्य त्रास किंवा हल्ला टाळता येणार आहे.
याशिवाय, रेबीज किंवा इतर आजार झाल्यास पाळीव कुत्र्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ नये, याची जवाबदारी श्वानमालकावर असेल. कुत्र्याच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष देणे व त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे हेही मालकाचे कर्तव्य राहील.
सिंघल यांनी स्पष्ट केले की, या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन प्रत्येक श्वानप्रेमी व श्वानमालकाने करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.



