नागपुरात बाप्पाच्या निर्माल्यापासून तयार होणार खत; शहरातील बगिचे होणार हिरवेगार, मनपा आयुक्तांकडून निर्माल्य रथांचे उद्घाटन

नागपूर :गणेशोत्सवात पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने (मनपा) यंदा विशेष पाऊल उचलले आहे. बाप्पाच्या निर्माल्यापासून खत तयार करून शहरातील उद्याने व बगिचे हिरवेगार करण्याचा उपक्रम मनपा राबवणार आहे. यासाठी निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशोत्सवात दरवर्षी शहरातील विविध सार्वजनिक मंडळांमधून निर्माल्य जमा करण्यासाठी मनपा रथांची सोय करते. पूर्वी 10 झोनसाठी 10 रथांची व्यवस्था होती. मात्र नागरिकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे यंदा ही संख्या वाढवण्यात आली असून तब्बल 19 रथ उपलब्ध असतील. यात 5 ई-रथांचाही समावेश आहे. यात एजी एनवायरोचे 12 आणि बीवीजी इंडियाचे 7 रथ असतील.
हे रथ सार्वजनिक मंडळांमधून भक्तिभावाने जमा झालेला निर्माल्य गोळा करून वैज्ञानिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करतील. त्यातून वर्मी कम्पोस्ट तयार होईल आणि ते खत शहरातील बगिच्यांमध्ये वापरले जाणार आहे. निर्माल्याचे खत बनवण्यासाठी भांडेवाडी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी आपल्या जवळच्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये निर्माल्य जमा करावा, अशी विनंती मनपाने केली आहे. सफाई कर्मचारी हे निर्माल्य रथांमध्ये एकत्रित करतील. सार्वजनिक मंडळांनीही आपल्या मंडपांमध्ये निर्माल्य कलश ठेवण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.



