काटोलमध्ये मोठा हादसा : नगरपरिषदेकडून खोडलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय बालकाचा मृत्यू, खानगांव कचरा डंपिंग यार्डची घटना संतप्त नागरिकांकडून जबाबदारांवर कारवाईची मागणी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. खानगाव पारधी बेड्यात नगरपरिषदेकडून खोदण्यात आलेल्या कचरा डेपोच्या मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय विराट राणा पवार या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काटोल नगरपरिषदेकडून खानगाव पारधी बेड्याच्या मागच्या भागात कचरा टाकण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले होते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. आज सकाळी साधारण १० वाजताच्या सुमारास विराट खेळताना या खड्ड्यात पडला आणि पाण्यात बुडाला. दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि कुटुंबीय तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने बालकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून त्यांनी नगरपरिषद व संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मृत बालकाची आई माधुरी राणा पवार या घटनेनंतर आक्रोशित अवस्थेत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, नगरपरिषदेकडून खोदण्यात आलेले हे खड्डे नीट बंदिस्त न केल्याने हा अपघात घडला असून प्रशासनाची ही मोठी निष्काळजीपणा आहे.
या दुःखद घटनेनंतर खानगाव परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक लोकांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

