नागपूरात बाप्पांच्या आगमनाची धूम

नागपूर : गणेश चतुर्थीच्या पावन दिनानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रासह नागपूरातही बाप्पांच्या आगमनाची भव्यता अनुभवायला मिळाली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागपूरकर या दहा दिवसांच्या पावन उत्सवासाठी आतुरतेने वाट पाहत होते.
आज सकाळपासूनच शहरात बाप्पा आणण्यासाठी भक्तांच्या गर्दीने उत्साहाचं वातावरण रंगवलं होतं. कोणी बाप्पांना हातावर घेत घराकडे घेऊन जात होते, कोणी सायकलवरून, तर कोणी डोक्यावर घेऊन आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत करत होते. ढोल-ताशांच्या गजरात, झांज-मंजीरांच्या निनादात आणि फटाक्यांच्या रोषणाईत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमलं.
शहरात बाप्पांच्या विविध रुपांच्या मूर्ती दिसत होत्या. मात्र, पर्यावरण रक्षणासाठी महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, केवळ शाडू मातीच्या मूर्तींचीच खरेदी करावी आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा.
नागपूरातील बाजारपेठा देखील बाप्पांच्या स्वागतासाठी सजल्या आहेत. पूजा साहित्य, फळं, सजावटीचे साहित्य यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गणेशोत्सवाचा आनंद आणि भक्तीचा झळाळता उत्साह पाहायला मिळत होता.
शहरात सर्वत्र आज एकच घोष गुंजत होता –
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!”


