विदर्भात पुन्हा पावसाचा जोर! २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

नागपूर : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सूनने विदर्भात सक्रियता दाखवली आहे. हवामान विभागाने २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान नागपूरसह पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागपूरच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम विदर्भातील अकोल्यामध्येही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागातील शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि त्याच्याशी जोडलेल्या द्रोण रेषेमुळे विदर्भात पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. या द्रोणरेषेमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारी नमी मध्य भारतात पोहोचत असून, त्यामुळे विदर्भात पावसाची तीव्रता वाढली आहे.
नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला असून, या कालावधीत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




