धापेवाड्यात शेतात काम करणाऱ्या तिघांचा विजेच्या झटक्याने मृत्यू

सावनेर तालुक्यातील धापेवाडा शिवारात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण घटनेत विजेच्या झटक्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या पावसात ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कलमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र धापेवाडा परिसरातील संजु सावजी ढाब्याजवळ शेतात काम सुरू असताना दुपारी साधारण तीन वाजता विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, शेतात काम करणाऱ्या निर्मला रामचंद्र पराते (60), वंदना प्रकाश पाटील (37) आणि एम. प्रकाश पाटील (18) यांच्यावर अचानक आकाशीय वीज कोसळली. विजेचा जबरदस्त झटका बसल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस ठाण्याचे थानेदार उमेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे तसेच हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून मृतदेह तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सावनेर येथे हलवले. दरम्यान सावनेरतहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन मृतकांच्या कुटुंबीयांची समजूत काढली व त्यांना धीर दिला.
या घटनेची माहिती पसरताच धापेवाडा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. मृतकांच्या घरावर शोककळा पसरली असून नागरिकांनीही कुटुंबीयांना आधार दिला.



