ओबीसी आरक्षणावर सावट; नागपूरमध्ये महासंघाची तातडीची रणनीती बैठक, जरांगे मुंबईकडे रवाना – नेत्यांची धावपळ सुरू

नागपूर :- ओबीसी आरक्षणावर पुन्हा एकदा संकटाचे सावट दाटले असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूरमध्ये महासंघाची तातडीची बैठक झाली. ही महत्त्वपूर्ण बैठक बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी पार पडली. आरक्षण वाचवण्यासाठी तातडीने मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबई गाठण्याची तयारी केली असून, त्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे यांच्या या हालचालीमुळे नागपूरमधील ओबीसी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.
बैठकीत उपस्थित नेत्यांनी स्पष्ट केले की, “आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करण्यात येईल. आवश्यक असल्यास मुंबईतही संघर्ष तापेल.”
महासंघाने घेतलेल्या या आपत्कालीन रणनीती बैठकीनंतर नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची हालचाल अधिक वेगाने सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत या संघर्षाचे रूप अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.




