मंदिरातून गाय चोरी करणारे आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात, कपिल नगर पोलिसांनी ३ आरोपींना केली अटक

नागपूर :- शहरातील विजय हनुमान मंदिरातून दान केलेली गाय चोरी करणाऱ्या आरोपींना कपिल नगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील वाहन व इतर पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी मंदिर उघडण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्यांना मंदिरात बांधलेली गाय दिसून आली नाही. तत्काळ शोध घेतला असता गाय सापडली नाही. नंतर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात काही जण गायीला घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून कपिल नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अखेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ३ आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंधक अधिनियम १९६० व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविकुमार सिंगल, सह आयुक्त राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस उपायुक्त नितीन कदम व सहायक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडिवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.




