नागपूरमध्ये सायबर ठगांचा मोठा कारनामा : क्रिप्टो व शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 1.86 कोटींची फसवणूक

नागपूर प्रतिनिधी :उपराजधानी नागपूरमध्ये पुन्हा एकदा सायबर ठगांनी नागरिकांना आपला बळी बनवले आहे. क्रिप्टो करंसी आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळेल, अशा गोड बोलांनी दोन नागरिकांना तब्बल 1 कोटी 86 लाख रुपयांचा चूना लावण्यात आला. या दोन्ही प्रकरणांची नोंद सायबर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पहिला प्रकार : 1.40 कोटींचा चूना
अमरावती रोडवर राहणारे कृष्णा नावाचे व्यवस्थापक (प्रायव्हेट कंपनीत नोकरी) फेसबुक व व्हॉट्सअॅप स्क्रोल करत असताना त्यांना क्रिप्टो गुंतवणुकीबाबत संदेश मिळाला. मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून लिंक पाठवून त्यांच्याकडून नोंदणी करून घेतली. सुरुवातीला १ लाखाची गुंतवणूक करून ४ लाख परत देत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
यावर विश्वास ठेवून कृष्णांनी वारंवार गुंतवणूक केली. इतकेच नव्हे तर मित्रांकडून उधार पैसे आणून त्यांनी एकूण १ कोटी ४० लाख ५० हजार रुपये गुंतवले. ऑनलाईन खात्यात नफा दाखवला जात होता. मात्र पैसे परत मागितले असता टाळाटाळ करण्यात आली आणि अखेर ठगांनी संपर्क तोडला. कृष्णांनी तत्काळ सायबर थाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
दुसरा प्रकार : 23 लाखांची फसवणूक
बेलतरोडी येथील कल्याणी नावाच्या महिलेला व्हॉट्सअॅपवर शेअर बाजारात गुंतवणुकीसंदर्भात संदेश आले. त्या एका ग्रुपमध्ये सामील झाल्या. ग्रुपमधील सिन्हा, आनंद राठी व रत्नाकर या नावाने वावरणाऱ्या ठगांनी मोठ्या नफ्याचे आश्वासन देत २३ लाख ७० हजार रुपये गुंतवायला लावले. सुरुवातीला विश्वास बसला, पण नंतर पैसे परत न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अखेर त्यांनीही सायबर पोलिसांत धाव घेतली.
या दोन्ही प्रकरणांतून हे स्पष्ट झाले आहे की सायबर ठग सोशल मिडिया आणि मेसेजिंग अॅप्सचा वापर करून सामान्य नागरिकांना फसवत आहेत. ‘लालचाला बळी पडू नका, कुठल्याही अज्ञात लिंकवर क्लिक करून पैसे गुंतवू नका,’ अशी कडक सूचना पोलिसांनी दिली आहे.



