सोन्याच्या ब्रेसलेटची चोरी करणारा आरोपी गजाआड,ऑनलाइन गेमच्या व्यसनासाठी करायचा चोरी

नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराफा बाजारातील दुपारी गजबजलेल्या सोन्याच्या दुकानातून सोन्याचे ब्रेसलेट चोरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऑनलाइन गेमचे व्यसन आणि कर्जबाजारीपण यामुळे त्याने ही चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी २९ वर्षीय शुभम परसराम डुकरे (रा. कीर्तिनगर, दिघोरी) हा युवक इतवारी सराफा ओलीतील कक्कड ज्वेलर्स या दुकानात ब्रेसलेट खरेदीच्या बहाण्याने गेला. दुकानातील विक्रेत्या युवतीने त्याला दोन सोन्याचे ब्रेसलेट दाखवले. शुभमने ती हातात घातली आणि त्यानंतर क्रेडिट कार्डने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. मात्र, कार्ड घरी असल्याचे सांगून तो ब्रेसलेट न काढताच गुपचूप दुकानातून बाहेर पडला आणि दुचाकीवरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच दुकानमालकाने तातडीने तक्रार दाखल केली. तहसील पोलिसांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासले. क्राईम ब्रांच युनिट–३ च्या पथकाने शोध मोहिम राबवून शुभमला मेडिकल चौकाजवळील व्हीआर मॉल परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरी गेलेले दोन्ही सोन्याचे ब्रेसलेट, मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस चौकशीत शुभमने उघड केले की, तो ऑनलाइन गेमचा व्यसनी आहे. त्यासाठी घेतलेल्या पैशांतून तो कर्जबाजारी झाला होता. कर्जदारांच्या दबावामुळेच त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे त्याने सांगितले. शुभम हा अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला असून एका इन्शुरन्स कंपनीत नोकरी करीत होता. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला असून पत्नी एका खासगी बँकेत कार्यरत आहे.
सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.



