आईसमोरच मुलाची चाकूने भोसकून हत्या,जुन्या वैमनस्यातून हत्या

अमरावती (प्रतिनिधी) :अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील अशोक नगर परिसरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. जुन्या वैमनस्यातून आईसमोरच मुलाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली.
मृताची ओळख अमोल वसंत डाखोरे (४०) अशी झाली आहे. विशेष म्हणजे अमोलने बरोबर वर्षभरापूर्वी शेजाऱ्याची हत्या केली होती. त्या गुन्ह्यात तो तुरुंगात होता. अवघ्या ८ ते १० दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता.
गेल्या दोन दिवसांपासून अमोलच्या घरी महालक्ष्मीची पूजा सुरू होती. दरम्यान आज सकाळी शेजाऱ्याचा मुलगा अमोलच्या घरी चाकू घेऊन घुसला. सुरुवातीला घरात हाणामारी झाली आणि नंतर ती रस्त्यावर आली. त्यात अमोलवर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली.
मुलाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या आई सुशीला वसंत डाखोरे (५५) यांनाही आरोपीने चाकूने वार केले. त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण तिवसा परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या हत्येने गावात खळबळ माजली आहे. तिवसा पोलिसांनी आरोपी अवजड याचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.


