“जादूटोण्याच्या संशयावरून चाकू हल्ला: नागपुरात दोन भावांवर जीवघेणा हल्ला, चार जण अटकेत”

नागपूर: अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या काही लोकांनी दोन निरपराध भावांवर जीवघेणा हल्ला केला, ही धक्कादायक घटना नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. राणी भोसले नगरमध्ये राहणाऱ्या नीलेश रामटेके आणि नरेंद्र रामटेके या दोन भावांवर त्यांच्याच शेजाऱ्यांनी जादूटोण्याच्या संशयावरून चाकूने हल्ला केला.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप पंचधारे आणि त्याचा भाऊ हरिशंकर पंचधारे यांना संशय होता की रामटेके बंधू त्यांच्या कुटुंबावर जादूटोणा करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या घरात सतत त्रास होत आहे. या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्यांनी 31 ऑगस्टच्या रात्री रामटेके बंधूंच्या घरासमोर गोंधळ घातला आणि अचानक संदीप पंचधारेने नीलेश रामटेके याच्यावर चाकूने वार केला. ही झटापट थांबवण्यासाठी आलेल्या नरेंद्र रामटेके यालाही गंभीर इजा झाली.
घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत संदीप पंचधारे, हरिशंकर पंचधारे, त्यांचे वडील गजानन पंचधारे आणि त्यांचा सहयोगी ऋषिकेश औंदेकर यांना अटक केली. या चौघांविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


