नागपूरात गुन्हेगारांचे तांडव; पोलिसांच्या रूटमार्च नंतरही – शांतिनगरात हाणामारी, १७ आरोपी अटकेत

नागपूर : शहर पोलिसांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काढलेल्या रूट मार्चनंतर केवळ काही तासांतच शांतिनगर परिसरात गुन्हेगारांनी खुलेआम दहशत माजवली. धारदार शस्त्रं हातात घेऊन गुंडांनी गाड्यांची तोडफोड करत दंगल केली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बुधवारी सायंकाळी नागपूर पोलिसांनी शांतिनगर भागात मोठ्या दिमाखात रूट मार्च काढला. उद्दिष्ट होते – नागरिकांना सुरक्षेची हमी मिळावी, पोलिसांची उपस्थिती जाणवावी. परंतु पोलिसांचा ताफा परतताच, त्याच रात्री परिसर गुन्हेगारांच्या दहशतीने थरथरला.
एनआयटी गार्डन परिसरात पैशांच्या वादातून काही असामाजिक घटकांनी हाणामारी केली. त्यांच्याकडे धारदार शस्त्रं होती. या शस्त्रांच्या जोरावर त्यांनी गाड्यांची तोडफोड करून लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण केलं. स्थानिकांनी पोलिसांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करताना सांगितलं की, रूट मार्चचा या गुंडांवर काहीच परिणाम झाला नाही. उलट ते अजूनही बेधडकपणे परिसरात फिरत राहिले.
घटनेची माहिती मिळताच शांतिनगर पोलिसांनी तातडीने हालचाल केली. कारवाई करत १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.



