नागपूरात ट्रक व जड वाहनांवर ‘नो एंट्री’ ८ सप्टेंबरपासून सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत शहरात प्रवेशबंदी

नागपूर : शहरातील वाढता वाहतूक कोंडीचा प्रश्न व दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ८ सप्टेंबरपासून नागपूर शहरात ट्रक, ट्रेलर, डंपर, कंटेनर व इतर जड वाहनांना सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत प्रवेशबंदी राहणार आहे. फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच या वाहनांना शहरात येण्याची परवानगी दिली जाईल.
वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, शहरातून जाणाऱ्या सर्व जड वाहनांना आऊटर रिंगरोडचा वापर अनिवार्य असेल. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. हा नियम सध्या प्रयोगात्मक तत्त्वावर एका महिन्यासाठी लागू राहणार आहे.
अपघातांची भीषण नोंद
वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील ५ वर्षांत जड वाहनांमुळे झालेल्या ४२२ अपघातांत तब्बल ४५७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. हे चिंताजनक चित्र लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आवश्यक सेवांना सूट
तथापि, दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस, केरोसिन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे वाहन, अग्निशमन दल, सेना व पोलिसांचे वाहन, शासकीय कामासाठी वापरली जाणारी वाहने तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला या बंदीमधून सूट दिली जाणार आहे.
ट्रॅफिकला दिलासा
याआधी शहरात ट्रॅव्हल्स बसांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले होते. आता जड वाहनांवर लागू झालेल्या नो-एंट्री नियमामुळे नागपूरच्या रस्त्यांवरील गर्दी लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




