मुलानेच केली वडिलाची हत्या,दारुड्या मुलाचा झोपलेल्या वडिलांवर चाकूने हल्ला

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिंडकापार गावात गुरुवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. दारूच्या नशेत धुंद मुलाने झोपेत असलेल्या वडिलांवर चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव भावराव गोविंदा मांढरे (७५) असे असून आरोपी मुलाचे नाव रवि भावराव मांढरे (३१) आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वडील व मुलगा दोघेही दारूच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. गुरुवारी रात्री साधारण ९.३० वाजताच्या सुमारास भावराव मांढरे घरात झोपले असताना, नशेत असलेल्या रवीने चाकू उचलून त्यांच्यावर सलग वार केले. गंभीर जखमा झाल्याने भावराव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिस, डीवायएसपी रमेश बरकते तसेच फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
या घटनेने पिंडकापार गावात शोककळा पसरली असून नागरिक दारूच्या व्यसनामुळे झालेल्या या अमानवी कृत्याचा निषेध करत आहेत.
सध्या रामटेक पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.



