शांतिनगरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड; १७ आरोपींना अटक

नागपूर : शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शांतिनगरातील दंगलप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुधवारी शहर पोलिसांनी नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी रूट मार्च काढला होता. मात्र, त्याच रात्री शांतिनगर परिसरात गुन्हेगारांनी धारदार शस्त्रांच्या जोरावर खुलेआम दहशत माजवली. गाड्यांची तोडफोड करून परिसरात गोंधळ उडवत लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता आणि पोलिसांच्या दक्षतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ पावलं उचलत केवळ काही तासांतच दंगल माजवणाऱ्या १७ आरोपींना अटक केली आणि गुन्हा नोंदवला. पुढील चौकशीत हे सर्व आरोपी शांतिनगर परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. अटक झाल्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी आरोपींना त्याच परिसरात नेऊन धिंड काढली, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसले.
या कारवाईमुळे पोलिसांचा वचक पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला असून, पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले की गुन्हेगार कितीही ताकदवान असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. शांतिनगरातील नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं स्वागत केलं असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




