पत्नीला वाचवण्यासाठी पतीची नाल्यात उडी, शेजाऱ्यांनी खुर्चीच्या मदतीने वाचवले दोघांचे प्राण

नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत बेझनबाग परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. घराच्या पहिल्या मजल्यावर काम करत असताना अचानकपणे महिला मागील बाजूस असलेल्या नाल्यात कोसळली. पत्नीला वाचवण्यासाठी तिचा पती क्षणाचाही विलंब न करता थेट नाल्यात उडी घेऊन खाली उतरला. या जीवावरच्या धडपडीमध्ये दाम्पत्याचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अद्वितीय धैर्य दाखवत खुर्चीच्या साहाय्याने दोघांना सुरक्षित बाहेर काढले.
या घटनेत ममता रोडगे (पती विजय रोडगे) गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि मामाला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
बेझनबागमध्ये राहणारे रोडगे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह याच भागात वास्तव्यास आहे. घटनेच्या वेळी ममता कामानिमित्त पहिल्या मजल्यावर गेली असता अचानक तोल जाऊन ती नाल्यात कोसळली. हे पाहून पती विजयने क्षणाचाही विचार न करता नाल्यात उडी मारली.
गनीमत म्हणजे पोलिस व अग्निशमन दल येण्यापूर्वीच शेजाऱ्यांनी तत्परता दाखवत प्लास्टिकच्या खुर्चीच्या मदतीने ममता आणि विजय दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. या प्रसंगामुळे परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती.



