मराठा समाजाला ‘मराठा म्हणूनच’ सरसकट आरक्षण द्या – राजे मुदोजी भोसले महाराजांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

नागपूर :- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात असंतोष वाढत असताना राजे मुदोजी भोसले महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपले स्पष्ट मत नोंदवले. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवत राजे मुदोजी भोसले महाराज यांनी शासनाकडे एक महत्वाची मागणी मांडली.
भोसले महाराज म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असली तरी यामधून केवळ 58 लाख कुणबी नोंदी असलेले मराठेच लाभ घेऊ शकतील. त्यातील कागदपत्रातील त्रुटीमुळे प्रत्यक्षात लाभ घेणाऱ्यांची टक्केवारी आणखी घटण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरीत सुमारे 2.50 कोटी मराठ्यांचे काय, हा प्रश्न गंभीर आहे.
“मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळाल्यास कुणबी नोंदी असलेले मराठे आणि उर्वरीत सर्व मराठे यांना समान न्याय मिळेल. त्यामुळे राज्यातील सर्व मराठा समाजाला ‘मराठा आरक्षणाचा’ थेट फायदा मिळेल व पेच निर्माण होणार नाही,” असे भोसले महाराजांनी ठामपणे सांगितले.
शासनाने मराठ्यांचे नुकसान होऊ देऊ नये, ही विनंतीदेखील राजे मुदोजी भोसले महाराज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.


