नागपुरात ओबीसी समाजाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक; मराठा समाजाला दिलेल्या जीआरवर सविस्तर चर्चा

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी समाजातील राजकीय नेते तसेच ओबीसी वकील महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक आज नागपुरातील रवी भवन येथे सुरू झाली आहे.
या बैठकीस ओबीसी नेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, आमदार डॉ. अभिजित वंजारी यांच्यासह विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि वकील महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत.
मराठा समाजाला दिलेल्या सरकारी निर्णय (जीआर) संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून जीआरची माहिती घेऊन त्यावर समाजाची पुढील भूमिका निश्चित करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) चे एसपी गटाचे नेते शेखर सावरबांधे यांनी सांगितले की, “ओबीसी समाजाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. मराठा समाजाला दिलेल्या जीआरचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार नाही यासाठी आम्ही ठोस भूमिका मांडणार आहोत.”
या बैठकीतून आगामी काळात ओबीसी समाजाची सामूहिक भूमिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



