ग्रेनाईट व्यापाऱ्याच्या घरी चोरी करणारा नवकर बंगालमधून जेरबंद
21 लाखाचे दागिने घेऊन झाला पोबारा

नागपूर | शहरातील गणेशपेठ भागातील ग्रॅनाईट व्यापाऱ्याच्या घरी घरकाम करणाऱ्या नोकराने तब्बल २१ लाखांची चोरी करून फरार झाल्याची घटना उघडकीस आली होती. क्राइम ब्रांचने कसून तपास करत आरोपीला थेट पश्चिम बंगालमधून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी राजा चौधरी हा मूळचा नदिया (प. बंगाल) येथील रहिवासी असून, त्याने बनावट आधारकार्डच्या आधारे व्यापारी अजित सारडा यांच्या घरी नोकर म्हणून प्रवेश मिळवला होता. अनाथ असल्याचे सांगून विश्वास संपादन करत त्याने तीन महिने घरात काम केले.
आरोपीने या काळात संपूर्ण घराची रेकी केली आणि ऑगस्ट महिन्यात ३८७ ग्रॅम सोने, हिरेजडित दागिने आणि १.७० लाख रुपये रोख असा ऐवज लंपास करून आपल्या गावाकडे पळ काढला. चोरीनंतर आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी आपला नवीन मोबाईल दुसऱ्याला वापरायला दिला.
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तपासादरम्यान हाती लागलेल्या रेल्वे तिकिटाच्या धाग्यावरून आरोपीचा मागोवा घेतला. क्राइम ब्रांचच्या पथकाने परगना जिल्ह्यातील सोडपूर गावातून, अगदी बांगलादेश सीमेवरूनच त्याला बेड्या ठोकल्या.
चोरी केलेल्या सोन्यातून आरोपीने हिरे वेगळे ठेवले व सोन्याचे दागिने अत्यल्प किंमतीत विकले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ११० ग्रॅम हिरेजडित दागिने,तीन मोबाईल,एक टॅब, रोख रक्कम
असा मिळून तब्बल १७ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



