नागपूरात काँग्रेसचे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात जोरदार आंदोलन,गांधी पुतळ्याजवळ घोषणाबाजीने परिसर दणाणला

नागपूर : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज (10 सप्टेंबर 2025, बुधवार) नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकाळी 11 वाजता व्हेरायटी चौकातील गांधी पुतळा परिसरात घेण्यात आले.
या वेळी काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान “जनविरोधी विधेयक परत घ्या”, “लोकशाहीचा गळा घोटू देणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसने आरोप केला की हे विधेयक आणून राज्य सरकार जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू इच्छित आहे.
आंदोलनाला संबोधित करताना काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याला बाधक आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करू पाहत असून, त्याला काँग्रेस कडाडून विरोध करेल.
गांधी पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनात विविध पक्षनिष्ठ नेते, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून संपूर्ण आंदोलन सुरळीत पार पाडले.
काँग्रेस कमिटीने सरकारला इशारा दिला की, जर हे विधेयक तातडीने परत घेण्यात आले नाही, तर पुढील काळात अधिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.




