ट्रक चालकानेच साथीदारांसोबत केली ४.३० लाखांची तूरडाळ फसवणूक; पारडी पोलिसांकडून चालक अटकेत, इतर फरार आरोपीचा शोध सुरु

नागपूर : विश्वासघातकीपणाचा धक्कादायक प्रकार पारडी परिसरात समोर आला आहे. ट्रक चालकानेच आपल्या साथीदारांसह ४ लाख ३० हजार रुपयांची तूरडाळ हडप केली. या प्रकरणात पारडी पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारडी येथील विशाल दिलीप संचेती यांची कापसी भागात निर्मल दाल मिल आहे. उत्तर प्रदेशातून आलेल्या मागणीनुसार त्यांनी २२ ऑगस्ट रोजी तूरडाळने भरलेला ट्रक रवाना केला होता. हा ट्रक चालक ज्ञानेश्वर सुभाष अवचार यांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र, ऑर्डरप्रमाणे दाळ उत्तर प्रदेशात पोहोचविण्याऐवजी चालकाने आपल्या साथीदारांसह मार्गातच ती दाळ विकून टाकली.
या गैरप्रकारात चालकासोबत त्याचे साथीदार साहिल उर्फ अफजल खान व लालबहादुर रामबच्चन सनैया हे देखील सहभागी होते. प्रकरण उघड झाल्यानंतर संचेती यांनी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सध्या पोलिसांनी चालक ज्ञानेश्वर अवचार याला अटक केली असून, त्याचे साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे. या प्रकरणामुळे व्यापारी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




