नागपूरात तलवारीच्या धाकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद, मुलगी सुरक्षित

नागपूर | शहरात पुन्हा एकदा थरारक घटना घडली आहे. गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत एका 18 वर्षीय तरुणाने तलवारीच्या धाकावर 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलीला सुरक्षित सुटका करून आरोपीला जेरबंद करण्यात यश आलं आहे.
आरोपीचं नाव अमित मनोज सोनटक्के असं असून त्याचा मुलीसोबत पूर्वी परिचय होता. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि मुलीमध्ये वाद झाल्याने पीडित मुलीने प्रतापनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या गोष्टीचा राग धरून आरोपीने संतापाच्या भरात हे पाऊल उचललं.
घटनेची वेळ 10 सप्टेंबर, मध्यरात्री दोन वाजताच्या सुमाराची आहे. आरोपी तलवार घेऊन पीडितेच्या घरी दाखल झाला. दार ठोठावल्यावर मुलीच्या 64 वर्षीय आजीने दार उघडताच आरोपीने त्यांना तलवारीचा धाक दाखवून घरात प्रवेश केला. त्यानंतर झोपलेल्या मुलीला उठवून तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला.
मुलीने विरोध केल्यावर आरोपीने तिचा गळा दाबला तसेच तलवार गळ्यावर ठेवून जीव घेण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने तीला घराबाहेर नेलं. पीडित मुलीच्या आजीने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
गणेशपेठ पोलिसांनी त्वरीत पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आणि थोड्याच वेळात त्याला अटक करण्यात आली. मुलीला सुरक्षितरीत्या सोडवण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी अपहरण, घरात घुसखोरी, जीव देण्याची धमकी, विनयभंग तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपी अमित सोनटक्के याला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा जीव वाचला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास गणेशपेठ पोलीस करत आहेत.



