नागपूरच्या मलकापूरात स्कूल व्हॅन-बसची भीषण धडक; व्हॅन चालक गंभीर जखमी, काही मुले जखमी
अपघातानंतर नागरिकांचा रोष उसळला; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

नागपूर | मलकापूर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. भवन्स स्कूलजवळ कोराडीच्या दिशेला जात असताना एक स्कूल व्हॅन आणि स्कूल बस यांची जोरदार धडक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नव्हते. मात्र, व्हॅनमध्ये तब्बल सात ते आठ विद्यार्थी प्रवास करत होते. या भीषण धडकेत काही मुले किरकोळ जखमी झाली असून व्हॅन चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या स्कूल बसला जोरदार धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांचा संताप उफाळून आला. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे लोकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.



