नागपूर जिल्हा न्यायालयात जजच्या कारला लागली अचानक आग; वेळीच आटोक्यात, मोठा अनर्थ टळला

नागपूर | नागपूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. न्यायालय परिसरात उभी असलेली जजांची कार अचानक आगीत भडकली. या घटनेमुळे काही वेळ परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून अचानक धूर निघू लागला आणि क्षणात ती गाडी ज्वाळांनी वेढली गेली. यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने वकील व कर्मचारी उपस्थित होते. मात्र सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेले पोलीस हवालदार सुनील तिवारी यांनी तात्काळ सूजबूज दाखवत अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवले.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतर गाड्यांपर्यंत पसरली नाही. त्यामुळे अनेक वाहने सुरक्षित राहिली. आग कशामुळे लागली याचा नेमका उलगडा अद्याप झाला नाही. पोलिस व अग्निशमन विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.



