10 वहाना सोबत कुख्यात वाहनचोर अटक: ७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूर :वाडी पोलिसांनी मोठी कामगिरी करत वाहनचोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी विजय रंजीत सोनबसे (वय २३, रा. सावरगाव, ता. नरखेड, जि. नागपूर) याला अटक करून त्याच्याकडून तब्बल १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत अंदाजे ७,५०,००० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस ठाणे वाडी येथे दाखल गुन्हा क्र. ५४०/२०२४ कलम ३०३(२) भा.दं.सं. अंतर्गत दाखल प्रकरणाच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. वाडी तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित विजय सोनबसे यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने विविध इसमांना चोरीच्या दुचाक्या विकल्याचे उघड झाले. आरोपीने खोट्या कागदपत्रांवर वाहन विक्री केल्याचे समोर आले असून काही दुचाक्या त्याने स्वतःकडेच लपवून ठेवल्या होत्या.
आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करून पंचनामा करण्यात आला असून आतापर्यंत ५ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या कारवाईमुळे वाहन चोरी प्रकरणांमध्ये मोठा यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.


