कोचवर चढलेल्या तरुणाला विजेचा जबर धक्का; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

नागपूर | शुक्रवारी दुपारी नागपूर रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली. नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22414) मध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) वायरचा जोरदार विजेचा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडे दोन वाजताच्या सुमारास हा तरुण पुणे हमसफर एक्सप्रेसच्या एसी कोचवर चढला. त्यावेळी त्याचा स्पर्श वरून जाणाऱ्या ओव्हरहेड वायरला झाला आणि क्षणातच विजेचा जोरदार धक्का बसला. धक्क्यामुळे तो कोसळून खाली पडला व गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्टरांनी तत्काळ न्यू यार्ड पोलीस ठाण्याला कळवले. आरपीएफ हेड कॉन्स्टेबल टी.के. बिसेन यांनी तातडीने तरुणाला मेयो रुग्णालयात हलवले. त्याची अवस्था गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असावा, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.



