नागपुरात सकाळपासून मुसळधार पाऊस; काळ्या ढगांनी व्यापलेलं आकाश, ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे

नागपूर | सोमवार सकाळपासूनच नागपूर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी अकराच्या सुमारास हलक्या सरींनी सुरुवात झाली आणि काही वेळातच काळ्या ढगांनी संपूर्ण आकाश व्यापलं. त्यानंतर मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः भिजवून टाकलं.
या अचानक पावसामुळे अनेक भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कामावर निघालेल्या नागरिकांना आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याने रस्त्यांवर वाहनांची मोठी कोंडी पाहायला मिळाली. विशेषतः दुचाकीस्वारांना पावसाच्या पाण्यातून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे.
हवामान खात्याने यापूर्वीच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला होता. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, जोरदार वाऱ्यासह विजांचा धोकाही कायम असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि उकसणारी उष्णता सहन करणाऱ्या नागपूरकरांना या पावसाने दिलासा दिला असला, तरी ठिकठिकाणी झालेल्या पाणी तुंबल्याने आणि वाहतुकीतील गोंधळामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. लहान मुलं व तरुणाई पावसाचा आनंद घेताना दिसत असली, तरी कार्यालयीन आणि कामकाजाच्या ठिकाणी जाणाऱ्यांना मात्र या पावसाने मोठी चिंता दिली आहे.



