“कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी दिलासा! नागपूरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार – मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश”

नागपूर : राज्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना व्यापक आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार (१५ सप्टेंबर) रोजी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नागपूरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाच्या अपूर्ण इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या कामासाठी आवश्यक निधी अनुपूरक मागणीद्वारे उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यात प्रभावी कॅन्सर धोरण राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाला निर्देश देताना सांगितले की, राज्यातील नागरिकांना सुलभ, व्यापक व गुणवत्तापूर्ण कॅन्सर उपचार मिळण्यासाठी सर्वंकष धोरण तयार केले जावे.
त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर उपचार केंद्रे, निदान सुविधा, डे केअर युनिट, रेडिओथेरपी आणि कीमोथेरपी युनिट्स उभारणे गरजेचे आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागणार नाही, आणि उपचार तत्काळ मिळू शकतील.
याशिवाय, राज्यातील रुग्णांना वेळेत व कार्यक्षमतेने सेवा मिळावी यासाठी L3 स्तरावरील उपचार केंद्रांना जोडणारे क्लाउड कमांड सेंटर उभारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले की, “कॅन्सर रुग्णांच्या उपचारात वेळेचा मोठा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे तातडीने निदान आणि प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.”
या महत्त्वाच्या बैठकीस राज्य मंत्री माधुरी मिसाळ तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




