बडनेऱ्यात चोरी-गुन्हेगारी वाढली – महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांचा पोलिसांना इशारा

बडनेरा : – बडनेरा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना आणि गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी थेट महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्याकडे मांडल्या. यानंतर आयुक्तांनी सोमवारी शहराचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
पाहणी दरम्यान मिळालेल्या तक्रारीनुसार शासकीय कामकाजात मालमत्ता चोरीला गेल्याचेही समोर आले आहे. यावरून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात आयुक्त सौम्या शर्मा यांनी बडनेरा पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्याशी विशेष चर्चा केली. वाढत्या चोरी आणि गुन्हेगारीवर तातडीने नियंत्रण आणण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी पोलिसांना दिले. “शहरात शिस्त व कायदा सुव्यवस्था राखणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. यावर त्वरित नियंत्रण मिळवले नाही, तर कठोर पावले उचलली जातील,” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी आयुक्तांनी नागरिकांना देखील पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. चोरी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आणि महानगरपालिका प्रशासन एकत्रितपणे कार्यरत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


