आमदार किरण सरनाईक यांच्या कारची युवकाला धडक, तरुण थेट कोमात!
अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या एका मुलाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक , वाशीम यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर (वय 25, वर्ष राहणार गौरक्षण वाडी चिखली, या तरुणास चिखली शहरातील पानगोळे हॉस्पिटलसमोर धडक दिली. या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी कार घेतली ताब्यात
आमदार सरनाईक हे बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात होते. घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकास गाडीत टाकून जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. मात्र आमदार सरनाईक यांची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
इनोव्हा गाडीचेही नुकसान
या अपघातात इनोव्हा गाडीचेही नुकसान झाले आहे. दुसरीकडे हा अपघात होताच आमदारांनी आपली गाडी थांबवून लगेच तरुणाला रुग्णालयात नेले. सध्या त्याची प्रकृती चिंताचनक आहे. तो सध्या कोमात आहे. त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. मात्र तरुण सध्या कोमात असल्याने नेमके काय होणार? याबाबत अनिश्चितता आहे.
अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही
दरम्यान या अपघातानंतर आमदारांची कार पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पोलीस काही कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरुणाच्या नेतवाईकांना या अपघाताबद्दल सांगण्यात आले आहे.



