नागपुरात मोमोज चाट सेंटरला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला,चाट सेंटर जळून खाक

नागपूर : शहरातील न्यू नंदनवन रोडवरील मोमोज चाट सेंटर येथे आज (२२ सप्टेंबर) दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
स्थानिकांनी धूर आणि आगीच्या ज्वाळा पाहताच तात्काळ अग्निशमन विभागाला कळविले. माहिती मिळताच लकडगंज अग्निशमन केंद्रातील जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरून अनर्थ होण्यापासून टळला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असल्याचे समजते. घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
अग्निशमन विभागाने नागरिकांना विद्युत उपकरणे व वायरिंगची नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या अपघातांना आळा बसेल.




