नागपूर विभागात नैसर्गिक आपत्तीचा तडाखाः 8500 पेक्षा जास्त घरांचे नुकसान, 69 जणांचा मृत्यू

नागपूर : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अनेक जण रस्त्यावर आले. नदी नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट त्यांच्या घरात घुसले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ८ हजार ३७४ घरांचे अंशता तर १३२ घरांचे पूर्णता नुकसान झाले. इतर नुकसानही मोठ्या प्रमाणात आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये यंदाचा पाऊस जनतेसाठी संकट घेऊन आला. अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो गावे जलमय झाली. आपत्तीमुळे नागरिकांचे मानसिक आणि आर्थिक दोन्ही नुकसान झाले आहे. घरांसह जनावरांचे गोठे, शेतीमाल आणि घरगुती वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या एकूण नुकसानीचे चित्र भयावह आहे. ६९ नागरिकांचा मृत्यू, तर ३२ जण जखमी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ असणाऱ्या जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, १२७ जनावरे दगावली आहेत. याशिवाय ८७८ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून मदतीसाठी अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे काटोलचे तहसीलदार राजू रणवीर यांनी सांगितले. शेतीवरही या आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीतील पिके पाण्याखाली गेली असून, ६९ हजार ६२७ शेतकरी बाधित झाल्याचे अहवालात नमूद आहे. या शेतकऱ्यांना केवळ आर्थिक तोटा नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या उपजीविकेवर संकट ओढवले आहे. विभागात ४३ हजारांपेक्षा अधिक तर नागपूर जिल्ह्यातील ६ हजार १२८ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शासकीय निकषानुसार मदत दिली जाईल, असे प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय येळे यांनी सांगितले.
#विभागात झालेले नुकसान
मृत्यू : ६९
जखमी : ३२
पशूहानी : १२७
गोठ्यांचे नुकसान : ८७८
बाधित शेतकरी : ६९ हजार ६२७



