धर्मपेठेत सैफरॉन हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; मॅनेजर अटकेत, मालक फरार

नागपूर : अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धर्मपेठ परिसरातील सैफरॉन नावाच्या कॅफेमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा, युनिट-२च्या पथकाने छापा घालून कारवाई केली. या कारवाईत पार्लर मॅनेजर हिमांशू पटेल याला अटक करण्यात आली असून पार्लरमधून ११ हुक्का पॉट, विविध फ्लेव्हरचे सुगंधी तंबाखू व इतर साहित्य असा तब्बल ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, कॅफेचा मालक मोहम्मद सैफ लतीफ नागानी हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
सध्या शहरात सुरू असलेल्या नवरात्र व इतर सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी व्यापक कांबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. याच दरम्यान पेट्रोलिंग करत असताना युनिट-२ च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की धर्मपेठेतील सैफरॉन कॅफेमध्ये हुक्का पार्लर सुरू आहे. या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ धाड टाकत छापा मारला.
कारवाईदरम्यान मॅनेजर हिमांशू पटेल याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पार्लरचा मालक मोहम्मद सैफ लतीफ नागानी असल्याचे सांगितले. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत ३६ हजारांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी अंबाझरी पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक आरोपीला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नागपूर पोलिसांकडून सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.



