नवरात्रात नागपूर पोलिसांचा उपक्रम : ‘दुर्गा मार्शल’ मोहिमेअंतर्गत महिला सुरक्षेची भक्कम हमी

नागपूर : नवरात्र उत्सवात महिला व लहान मुलींच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी विशेष पाऊल उचलले आहे. पोलिस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त (डीसीपी) रश्मिता राव यांच्या संकल्पनेतून ‘दुर्गा मार्शल’ या अनोख्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत महिला पोलिस कर्मचारी मोपेडवरून प्रतिदिन संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत गस्त घालणार आहेत. प्रत्येक टीममध्ये दोन महिला पोलिसांचा समावेश असेल. या महिला पोलिसांनी शहरातील गरबा–डांडिया स्थळे, देवीचे मंदिरे, बाजारपेठा आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी सक्रियपणे गस्त घालून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडायची आहे.
या उपक्रमामुळे महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होणार असून ‘दुर्गा मार्शल’ मोहिमेमुळे समाजात महिला सशक्तीकरणाचा संदेश पोहोचणार आहे. नवरात्र उत्सव हा भक्तीचा आणि उत्साहाचा सण असला तरी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महिलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरते. नागपूर पोलिसांनी हाच विचार करून हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा घटना आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून सर्वांसाठी नवरात्राचा उत्सव सुरक्षित आणि आनंददायी ठरेल.




