एम.डी. पावडर तस्कर अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त : सोनगाव पोलिसांची कारवाई
नागपूर : शहरातील अमली पदार्थ विरोधी मोहिमेत सोनगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या खबऱ्यावरून सोनगाव पोलिसांनी बुधवारी रात्री नागपूर-मेंढ रोडवरील शिवनगर फाटा जवळ सार्वजनिक रस्त्यावर उभ्या असलेल्या अॅक्टिवा गाडीवर कारवाई करत संशयित इसमाला ताब्यात घेतले.
गाडी क्रमांक एम.एच. ३१ ए.डब्ल्यू. ०४१४ ची तपासणी केली असता, चालकाने आपले नाव शरद श्यामराव कतलाम (वय 24, रा. शांतीनिकेतन नगर, चिंचभवन, वर्धा रोड, नागपूर) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची झडती घेतल्यावर त्याच्या पॅन्टच्या खिशातून ६ ग्रॅम एम.डी. पावडर, किंमत अंदाजे ६० हजार रुपये, तसेच मोबाईल फोन व अॅक्टिवा गाडी असा एकूण १,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एम.डी. पावडर विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर कलम ८(क), २२(ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.


