विदर्भाचे हृदय धोक्यात! वोक्हार्ट हॉस्पिटल सर्व्हेचा धक्कादायक निष्कर्ष : तरुण व मध्यमवयीनांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका

नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरने नुकतेच केलेल्या हार्ट हेल्थ इन्साईट्स सर्व्हेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. हृदयरोगाचा धोका आता वृद्धांपुरता मर्यादित न राहता तरुण आणि मध्यमवयीनांमध्येही झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व्हेनुसार हृदयरोगाचे रुग्ण सर्वाधिक 41 ते 60 वयोगटातील असले तरी 30 वर्षांच्या आसपासच्या तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. दहा वर्षांपूर्वी इतक्या कमी वयात हृदयरोग दुर्मिळ मानला जात होता, मात्र आज तणावपूर्ण नोकऱ्या, चुकीची जीवनशैली, अपुरी झोप आणि तपासणीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे तरुण रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने थेट रुग्णालयात दाखल होत आहेत.
डॉक्टरांच्या मते, ताण, धूम्रपान, बसून काम करण्याची सवय, पोटाभोवती वाढलेली चरबी, आहारातील बदल आणि मधुमेह ही प्रमुख कारणे आहेत. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे प्रतिबंधात्मक तपासणीची सवय अजूनही रुग्णांमध्ये नाही. बहुतेक रुग्ण छातीत दुखणे, घाम येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, तोपर्यंत उपचाराचा सुवर्णकाळ निघून गेलेला असतो.
सर्व्हेमध्ये असेही आढळले की दोन-तृतीयांश रुग्णांना स्वतःचा रक्तदाब, साखर किंवा कोलेस्टेरॉल पातळीबाबत योग्य माहितीच नसते. त्यामुळे हृदयविकाराची सुरुवातीची चिन्हे वेळेत न ओळखल्याने अनेकांचा जीव धोक्यात येतो.
वोक्हार्टचे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले की वेळेवर तपासणी, जीवनशैलीत बदल आणि जागरूकता हाच हृदयरोगाविरुद्धचा खरा उपाय आहे. या सर्व्हेत नागपूरसह मुंबई, एमएमआर आणि राजकोटमधील एकूण ३२६ डॉक्टरांचा सहभाग होता, त्यापैकी ४८ डॉक्टर नागपूरचे असून निष्कर्ष विदर्भातील आरोग्याचे खरे चित्र उघड करणारे आहेत.



