धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज – मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी करून दिल्या सूचना

नागपूर :
नागपूर महानगरपालिकेतर्फे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात दाखल होणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांसाठी व्यापक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसह पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी-सुविधांची काटेकोर तयारी मनपाकडून करण्यात आली आहे.
या सर्व व्यवस्थेची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (दि. 1 ऑक्टोबर) प्रत्यक्ष हजेरी लावून केली. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करताना स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था पाणीपुरवठा व इतर सोयींची बारकाईने तपासणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर, राजेंद्र राठोड यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. चौधरी यांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश देत सर्व कर्मचाऱ्यांना अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुविधा अखंडित राहाव्यात, यावर त्यांनी भर दिला.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा उत्सव असल्याने, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागपूर महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करून बौद्ध अनुयायांना स्वच्छ व सुसज्ज वातावरण पुरविण्यास सज्ज झाली आहे.




