विनोबा भावे नगरात भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली सापडून तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

नागपूर : नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनोबा भावे नगर परिसरात आज एक भीषण अपघात घडला. गिट्ट्यांनी भरलेल्या वेगवान डंपरखाली मोटारसायकल घसरल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमना येथून ऑटोमॅटिक चौकाकडे जात असलेला डंपर अचानक मोटारसायकलच्या अतिशय जवळ आला. त्या वेळी मोटारसायकलवर गजानननगर, हुडकेश्वर येथील बादल भक्तराज राऊत आणि पारडी येथील संदीप शेषराव धारपुरे बसले होते. हे दोघेही कोराडी देवीच्या दर्शनासाठी जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघे युवक रॉंग साईडने जात असल्याचे समोर आले आहे.
या अपघातात डंपरच्या मागील चाकाखाली दबून बादल राऊत यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप धारपुरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर जप्त करून चालकाला अटक करण्यात आली आहे. या अपघाताची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.



