मेयोतील महिला डॉक्टरशी छेडछाड : रोड रोमिओला पोलिसांनी केली अटक

नागपूर : मेयो हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरशी छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओला तहसील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने वारंवार महिला डॉक्टरचा पाठलाग करून त्रास दिल्याने अखेर गार्ड आणि महिला डॉक्टरांच्या मित्रांनी धाडस दाखवत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. माहितीप्रमाणे, संबंधित महिला डॉक्टर व त्यांची मैत्रीण या रात्री हॉस्टेलच्या ग्राउंडमध्ये फेरफटका मारत होत्या. त्यावेळी एक संशयित युवक सतत त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉक्टर व मैत्रीण हॉस्टेलमध्ये प्रवेश करत असतानाही आरोपीने त्यांचा पाठलाग केला.
महिला डॉक्टरांनी त्वरित आपल्या रूममध्ये जाऊन मित्र व गार्ड यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गार्ड व मित्रांनी मिळून आरोपीला रंगेहात पकडले आणि चोप देत तहसील पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाड व महिलांचा पाठलाग करण्याबाबत योग्य ती कारवाई सुरू केली आहे.



