७ वर्षे महिला सहकाऱ्याचे शारीरिक शोषण; मुलाला जीवे मारण्याची धमकी देत करीत होता अत्याचार

नागपूर :- नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका ३० वर्षीय आरोपीने सात वर्षे आपल्या महिला सहकाऱ्यावर शारीरिक अत्याचार करून तिचे सातत्याने शोषण केले. पीडित महिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तिला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी टिंकू प्रमोद सहारे (वय ३० वर्षे) व पीडिता हे दोघेही एकाच ठिकाणी काम करीत होते. कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचे रुपांतर आरोपीने जबरदस्तीच्या नात्यात केले. सात वर्षे आरोपी पीडितेचा छळ करत होता. तिच्या व तिच्या मुलाच्या जीवाशी खेळण्याची धमकी देऊन आरोपीने तिला गप्प बसवले.
पीडित महिला दीर्घकाळ या छळाला कंटाळली आणि अखेर धैर्य एकवटून तिने थेट इमामवाडा पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिलांवरील सातत्याने होणाऱ्या अत्याचारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
