धक्का लागल्यावरून तरुणाची चाकूने हत्या : दुर्गा विसर्जनाच्या आनंदाला गालबोट

नागपूर – दुर्गा विसर्जनाच्या निमित्ताने रॅली दरम्यान झालेल्या क्षुल्लक धक्काबुक्कीतून उफाळलेल्या वादाने अखेर जीवघेणी वळण घेतली. दोन भावानी मिळून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
मृताचे नाव अजय चव्हाण (वय २६, रा. मिनीमिनातनगर) असे असून, आरोपी आदित्य नीलेश चावरेकर (२१) व आकाश ऊर्फ टिंकू चावरेकर (२०, रा. मिनीमिनातनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास होम अँड द डिझायनर स्टुडिओसमोर देवेंद्र व दुर्गेश चव्हाण हे रॅलीची प्रतीक्षा करत असताना गर्दीमध्ये देवेंद्रला आरोपी आदित्यचा धक्का बसला. त्यावरून वाद वाढला आणि शिवीगाळ सुरू झाली. त्याच दरम्यान आरोपींनी अजयवर चाकूने हल्ला चढवला. गंभीर जखमी अजयला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोवर त्याचा मृत्यू झाला होता.
या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


