मका चोरीच्या वादातून शेतकऱ्याची निर्दयी हत्या; लाठ्यांनी ठेचून खून, मृतदेह फेकला खड्यात

नागपूर : सावनेर तालुक्यातील जटामखोरा गावात मका पिकाच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत शेतकऱ्याची ओळख वामन मोहन इरपाची (वय ६०) अशी झाली असून ते आपल्या साळ्याच्या शेतात काम करण्यास गेले होते. संध्याकाळी त्यांचा मृतदेह शेतातील पाण्याने भरलेल्या गटारात तरंगताना आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार आरोपी मनीष काठुलाल उईके याला शंका होती की, त्याचा मका चोरीला जात आहे. या संशयावरून वामन यांच्यासोबत त्याचे वाद झाले. वाद चिघळताच आरोपीने लाठी उचलून वृद्ध वामन यांच्यावर तडाखे द्यायला सुरुवात केली. मारहाण इतकी भयंकर होती की वामन यांचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर आरोपीने मानसिक संतुलन बिघडल्याचा आव आणत मृतदेह शेतातील गटारात फेकला. मात्र काही तासांतच त्याचे धाडस सुटले व तो थेट पोलिस ठाण्यात पोहोचून आत्मसमर्पण केले.
घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सागर खर्डे, ठाणेदार आशीष ठाकुर व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी करून पंचनामा केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या अमानुष घटनेमुळे जटामखोरा गावात शोककळा पसरली आहे. मका या नगण्य कारणावरून जीव घेणारी ही हिंसक प्रवृत्ती पाहून ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. समाजात वाढत्या असंवेदनशीलतेबाबतही या घटनेने पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


