“ऑपरेशन थंडर” अंतर्गत एनडीपीएस पथकाची मोठी कारवाई – ओरिसातून आणलेला 12 किलो गांजा पारडीत जप्त, दोन आरोपी अटक; दोन फरार

नागपूर : अंमली पदार्थांविरोधातील “ऑपरेशन थंडर” या विशेष मोहिमेअंतर्गत एनडीपीएस पथकाने आणखी एक मोठी कारवाई करत नागपूर शहरात 12 किलो गांजा जप्त केला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पारडी पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
घटना दि. 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास भंडारा-नागपूर हायवेवरील पाल इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळील नाका क्रमांक 5 पारडी येथे घडली. गस्तीदरम्यान दोन संशयित युवक दिसल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 12 किलो गांजा, हॅपी ऑटो, ॲल्युमिनियम प्लेट्स व रॅक, बर्गमन मोपेड व मोबाईल असा एकूण 8 लाख 44 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी मोहम्मद शारीक मोहम्मद वकील अन्सारी (30, रा. इंदिरा माता नगर, यशोधरा नगर) आणि मोहम्मद मासूम शेर अली शेख (22, रा. वनदेवी चौक, कांगारपुरा, यशोधरा नगर) यांना अटक करण्यात आली आहे. तर लावण्य राणा आणि उडीशातील गोपीनाथ भोक्ता हे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तपासानुसार, आरोपींनी ओरिसातून गांजा आणण्यासाठी ॲल्युमिनियमच्या रॅकखाली तो लपवून नागपूरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पथकाच्या दक्षतेमुळे त्यांना पारडी परिसरातच पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवन गजभिये यांच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करण्यात आली. कारवाईत सपोनि संदीप जाधव, पोउपनि नागेश पुन्नावाड, पोहवा मनोज नेवारे, सहदेव चिखले, विवेक आढावू, अरविंद गेडेकर, गणेश जोगेकर, नितीन साळुंखे, राहुल पाटील आणि शैलेश डोबले यांच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.
एनडीपीएस पथकाचा हा आणखी एक यशस्वी पराक्रम असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितले की, “ऑपरेशन थंडर” अंतर्गत अंमली पदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्रतेने आणि वेगाने राबविण्यात येणार आहे.




